
>> अरविंद पाटील
साहस, धाडस, बेधडक, थरारक, ना मनात भीती, जीव कधी जाईल याची पर्वा न करता जिवावर उदार होऊन अनेक थरारक कसरती अंगावर शहारे आणणारी दृश्ये करून प्रेक्षकांची मने जिंकत पन्नास, शंभर किंवा दोनशे रुपये बक्षिसासाठी व सुगीतील धान्यासाठी ‘गीता सर्कस’ खेडय़ापाडय़ात जात आपली कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
सर्कस म्हटलं की, मोठमोठय़ा शहरांत तंबू मारून विविध धाडसी खेळांचे प्रदर्शन केले जाते. याठिकाणी फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे, असेच लोक याची मजा लुटतात. मात्र, खेडोपाडी जाऊन गोरगरीब लोकांचे मनोरंजन करताना तेथील प्रेक्षक हे सुगीच्या दिवसात रानामध्ये दिवसभर काबाडकष्ट करून दमून भागून घरी आल्यावर त्यांच्या दैनंदिन जीवनातील बदल म्हणून मनोरंजनाचे साधन म्हणून सर्कस, पिंगळा, कडकलक्ष्मी, वासुदेव, डोंबाऱयाचा खेळ यांसारखे खेळ करून आपल्या अंगी असलेल्या सप्तगुणांच्या कलेचे प्रदर्शन करतात.
एक वेगळेपण जपणारी, जिवावर उदार होऊन अनेक साहसी खेळ दाखवणारी सर्कस ही बघणाऱयांच्या मनाचा ठाव घेतात. विशेष म्हणजे हे कलाकार सुगीच्या दिवसांतील पाहुणे असतात. सायंकाळी सात वाजता ‘रात्रीस खेळ चाले’ या कार्यक्रमातून, अघोरी धाडसाने अंगावर दगड घनाने फोडणे, डोक्यावर फरशी फोडणे, अधांतरी रोपवरून चप्पल घालून चालणे, लहान मुलांना उंचावर बसवणे, आगीशी खेळणे, सायकल तोंडात धरणे, टेबलावर बाटली ठेवून त्यावर उभे राहणे, अशी मनाला भिडणारी दृश्ये करून पन्नास, शंभर रुपये बक्षिसे मिळवून व तांदूळ, भात घेऊन आपली गुजराण करतात.
सर्कशीतील कला ही जिवावर उदार होऊन करावी लागते. यामधून जीवन जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत. ही कला कायमस्वरूपी जोपासण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी किंवा कलाकारांना मासिक दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी केली आहे. – रामचंद्र चौगले, कुडुत्रीकर, लोक कलाकार संघ महाराष्ट्र राज्य